

देवरुख : मोबाईलचा वापर करून दुसऱ्यांना त्रास देता व पैशाची मागणी करता यासाठी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगून संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्याकडून अज्ञात इसमाने 22 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंगवली येथील येथील जनार्दन काशीनाथ आणेराव (वय 71) यांची फसवणूक झाली असल्याची तक्रार देवरुख पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात भा.दं.वि.क्र. 318(4) 3 (5) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(क) 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन आणेराव यांना मोबाईलवरून आर. के. चौधरी याने फोन करून डेटा प्रोटेशन बोर्ड ऑफ इंडिया मुंबई येथून बोलत असून, आपण घेतलेल्या मोबाईल सिमकार्डवरून लोकांना त्रास देता, पैशाची मागणी करता. याबाबत आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल आहे. तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याचे पत्र दाखवून जॉर्ज मॅथ्यू यांनी आपल्या विरोधात फिर्याद दाखल केली असल्याचे नमूद केले. याबाबतचे त्यांना डिटेल्स दिले. यावरून आणेराव यांच्याकडून दि. 15 नोव्हेंबर सकाळी 9.30 ते 10 ते दि. 18 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञाताने 22 लाख 20 हजार रु. मागून घेऊन फसवणूक केली असल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात आणेराव यांनी दिली. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.