चिपळूणमध्ये तरूणाचा खून  Pudhari File Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : तरूणाच्या खुनाने चिपळूण हादरले

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बहादूरशेख परिसरात रविवारी (दि. 8) सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावरील खोल जमखांवरून या तरुणाचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव हमीद शेख असून तो मूळचा कराडचा असून सध्या तो चिपळूणमध्ये राहत होता.

पोलिसांनी तातडीने तपास करत काही तासातच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांत नीलेश आनंद जाधव (वय 30, वडार कॉलनी चिपळूण) व अन्य एक अल्पवयीनचा (17) समावेश आहे. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात या घडलेल्या घटनेमुळे चिपळूण शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका या गजबजलेल्या भागात या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच मृतदेहावरील खोल जखमावरुन पोलिसांनी खुनाच्या संशयाने तपास सुरू केला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयितांकडे चौकशी केली असता संबंधितांकडून रात्री दीड ते दोनच्या सुमारास संशयित आरोपी घटनास्थळावरुन जात होते. यावेळी हमिद शेखही तेथे होता. त्यावेळी संशयित व शेख यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि हाणामारीवर आला. संशयित आरोपींनी त्या फरशी उचलून शेख याच्या डोक्यात मारली व नंतर दगड उचलून डोक्यात घातला. यामुळे तो तरूण जागेवरच मृत झाल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.

ज्या युवकाचा खून झाला. तो चिपळूण कावीळतळी परिसरात नातेवाईकांकडे वास्तव्यास होता. मूळचा तो कराड येथील असून त्याची आई कुवेत येथे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सलमा करीम लतीफ शेख (64, रा. काविळतळी, शिवशक्ती अपार्टमेंट चिपळूण) यांनी फिर्याद दिली.

शहरात बारा तासांत दोन दुर्घटना...

चिपळुणातील बहादूरशेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात केवळ 12 तासांत दोन दुर्दैवी घटना घडल्या. शनिवारी रात्री 9.30 नंतर चौकात बसलेल्या गाय आणि वासराला एका कारने जोरदार धडक दिली. या धडकेत गायीसोबत असलेल्या वासराचा जागीच मृत्यू झाला, तर गाय गंभीर जखमी झाली. यावेळी सुमारे तासभर घटनास्थळी गोंधळ सुरू होता. यानंतर सकाळी तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ऐन गणेशोत्सवातील या दोन्ही घटनांनी शहरात हळहळ व्यक्त होत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT