Mumbai Vijaydurg Ro Ro Service Pudhari
रत्नागिरी

Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry | मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अवघ्या काही दिवसांतच ठप्प

Mumbai Vijaydurg Ro-Ro Ferry | मोठा गाजावाजा करुन सुरु झालेली मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या काही तासांत कापण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

मोठा गाजावाजा करुन सुरु झालेली मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या काही तासांत कापण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोकणवासीयांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखाचा व्हावा या उद्देशाने १ मार्च रोजी सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवा अवघ्या वीस दिवसांतच बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.

रस्ते आणि रेल्वे प्रवासाला सक्षम पर्याय म्हणून या जलमार्गाकडे पाहिले जात होते, मात्र नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे जहाज किनाऱ्याला लागण्यापूर्वीच भरकटले आहे.

या रो-रो सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन प्रवासी ६ ते ७ तासांत इच्छित स्थळी पोहोचत होते. मात्र, सेवेचा वेग जेवढा सुसाट होता, तेवढेच तिचे तिकीट दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. या बोटीतील प्रवासासाठी आकारले जाणारे दर आणि तिथे मिळणाऱ्या जेवणाचे अवाच्या सवा किमती, यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांनी या सेवेकडे पाठ फिरवली.

केवळ श्रीमंतांसाठीच ही सेवा आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. या आर्थिक बोज्यासोबतच बोटीमध्ये मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा दर्जाही निकृष्ट असल्याच्या तक्रारी समोर आल्या, ज्यामुळे प्रवाशांमधील नाराजी अधिकच वाढली. या प्रकल्पाच्या अपयशावर राजकीय स्तरातूनही कडक टीका होत आहे.

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या गोंधळावर नेमके बोट ठेवताना म्हटले की, कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते, ज्याचा इथे पूर्णपणे अभाव दिसला. मुंबईहून विजयदुर्गला पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या पुढच्या गावांत जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती.

विजयदुर्ग बंदरावर उतरल्यावर प्रवाशांची होणारी ही फरफट आणि बोटीतील तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांची संख्या घटत गेली. अखेर १९ मार्च रोजी ही सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आली. त्यातच देवगड परिसरात या बोटीला झालेला किरकोळ अपघात आणि सतत उद्भवणारे तांत्रिक बिघाड यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव सेवा स्थगित केल्याचे सांगितले असले तरी, महागडे दर आणि गैरसोयींमुळे झालेली प्रवाशांची पाठ फिरवणी हेच या बंदीमागचे मुख्य कारण मानले जात आहे. एकूणच रो रोव सेवेला ब्रके लागला आहे. त्यामुळे सध्या तरी कोकणवासीयांचा जलद सागरी प्रवासाचा आनंद पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीवर गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT