अनुज जोशी
खेड : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी येथे हॉटेल अनुसया परिसरात सोमवारी (दि.६) सकाळी दगड व मातीचा मोठा ढीग रस्त्यावर कोसळल्याने महामार्गाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणारी तसेच मुंबईहून कोकणात येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाने वाहनचालकांना तुळशी–विन्हेरे या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
संततधार पावसामुळे दरड हटविण्याच्या कामात अडथळे येत असून घटनास्थळी सध्या केवळ दोन जेसीबी आणि दोन डंपरच्या साहाय्याने माती व दगड हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होईल, याबाबत अद्याप निश्चित माहिती देण्यात आलेली नसून मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की, संबंधित ठिकाण हे दरडप्रवण क्षेत्र नसून डोंगरही महामार्गापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे येथे एवढ्या प्रमाणात माती व दगड कोसळणे अनपेक्षित होते. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून बोरज येथून कल्याण टोलवेजचा तसेच वेरळ येथून आर. बी. वेल्हाळ यांचा जेसीबी घटनास्थळी मागविण्यात आला असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महामार्गाच्या देखभाल आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पावसाळ्यापूर्वी घाटाची पाहणी झाली होती का, संरक्षण भिंत का उभारण्यात आली नाही, तसेच पंधरा वर्षांच्या देखभाल करारानुसार संबंधित ठेकेदाराची जबाबदारी काय होती, असे सवाल उपस्थित केले आहेत.
या प्रकरणी महामार्गाच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारासह कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. घटनास्थळी प्रशासन, महामार्ग विभाग आणि यंत्रणा कार्यरत असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.