खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकणातील राजकारणाला मोठा धक्का बसवणारी घडामोड काल घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला. या कारवाईनंतर कोकणातील मनसेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आज खेड (रत्नागिरी) येथे पत्रकार परिषद घेत वैभव खेडेकर यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला. “राज साहेबांच्या सोबत ३५ वर्ष राहिल्याचे हेच फळ मिळाले आहे. माझ्या बडतर्फीच्या पत्रावर राज साहेबांची सही नाही. साहेबांनी जर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, तर कदाचित हे पत्रच निघाले नसते,” असे ते म्हणाले.
खेडेकर यांनी पुढे स्पष्ट केले की, पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अलीकडेच ना. नितेश राणे यांची भेट घेतली होती. मात्र “फक्त भाजपसोबत जाण्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या चर्चेमुळे आमची बडतर्फी करण्यात आली आहे. आम्ही अनेकदा साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट झाली नाही,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांबाबत आपली बांधिलकी व्यक्त करताना ते म्हणाले, “आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे यानंतर थांबणार नाही. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढील वाटचाल ठरवू.” या घडामोडींमुळे कोकणातील मनसेमध्ये अस्वस्थता पसरली असून, खेडेकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.