मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा 'मेगा ब्लॉक' file photo
रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा 'मेगा ब्लॉक'

मोहन कारंडे

चिपळूण : एकीकडे कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाली असताना, आता मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील पुई येथे नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा विषय संशोधनाचा झाला आहे. गेली १२ वर्षे या महामार्गाचे चौपदरीकरण रडत-खडत सुरू आहे. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास खडतरच झाला आहे. त्यात आता कोकण रेल्वे बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असतानाच या महामार्गावर मेगा ब्लॉक घेतले जाणार आहेत. यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.

अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. दि. ११ जुलै ते १३ जुलै या तीन दिवसांत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहेत. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग उपलब्ध

या काळात पर्यायी मार्ग म्हणून पालीमार्गे मुंबईच्या दिशेने जाता येणार आहे. कोकणातील अनेक प्रवासी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची समस्या लक्षात घेता, पाली मार्गाने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेने मुंबईच्या दिशेला जात असतात. आता या मेगा ब्लॉकच्या कालावधीत त्यांना हा पर्याय निवडावा लागणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे रोहामार्गे त्यांना जाता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT