सागर मुळ्ये
देवरूख : सह्याद्री पर्वत रांगांमधील एका गुहेत वसलेले आणि साऱ्या राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दैवत श्रीक्षेत्र मार्लेश्वर या स्वयंभू देवाचा कल्याण विधी सोहळा म्हणजेच मार्लेश्वर व साखरपा येथील गिरिजादेवी यांचा विवाह सोहळा! प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा विवाह सोहळा मकर संक्रांतीला मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. यासाठी साखरपा तसेच मारळ गावातील वधू-वराकडील मंडळी आतापासूनच तयारीला लागली आहेत.
देवरूखपासून सुमारे 17 कि. मी. अंतरावर बसलेल्या मार्लेश्वरच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी लाखो भाविकांची रीघ लागलेली असते. या कल्याण विधी समारंभप्रसंगी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरते, तर या समारंभाची धामधूम मारळ परिसरातून दोन दिवस आधीपासूनच भाविकांच्या उत्साहाने सुरू असते. या ठिकाणी असलेला धारेश्वर धबधबा हा 250 फुटांवरून कोसळत असतो. पावसाळ्यातील या ठिकाणचे सौंदर्य तर प्रत्येकाला भुरळ घालणारे असते. मकर संक्रांतदिनी आद्य मार्लेश्वर आंगवली मठातून देवाची पालखी गुहेतील गाभाऱ्यापर्यंत आणली जाते. या पालखीसमवेत पाटगावचे मठपती, लांजा वेरवली मराठे, मुरादपूरचे भोई, चर्मकार मशालजी, मारळचे सुतार, अबदागीर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी न्हावी, असा मानकऱ्यांचा जमाव बरोबर असतो. पालखीतून आणलेला चांदीचा टोप गाभाऱ्यातील देवाच्या पिंडीवर बसवला जातो.
याच दिवशी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावातून वधू देवी गिरिजामातेची पालखी मार्लेश्वर शिखराकडे निघते. पालखी साखरपा येथून यजमान शेट्ये, परशेट्ये, जंगम व पुजारी आणि मानकऱ्यांसह गुरववाडी, बोंडयेमार्गेच दरवर्षी मार्लेश्वरकडे आणली जाते. कल्याणविधी सोहळ्याचे यजमान असलेली देवरूखनजीकची व्याडेश्वराची पालखीही यावेळी मार्लेश्वरकडे आणली जाते. मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या पायथ्याजवळ पवई येथे तिन्ही पालख्या एकत्र आणल्या जातात. यावेळी आंबव, लांजा तसेच मुरादपूर येथील दिंड्याही आनंदाने सामील होतात. महत्त्वाच्या कल्याण विधीप्रसंगी तिन्ही पालख्या आणल्या जातात, तर यावेळच्या करवलीचा मान प्रथेप्रमाणे नजीकच्या गोठणे पुनर्वसन गावातून बजावला जातो. हा सोहळा हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे साजरा केला जातो.
लांजाचे मठाधिपती यांच्या अधिपत्याखाली मार्लेश्वर देवाचा टोप आंगवली आणेराव, तर शेट्ये गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसतात. हा सोहळा मोठ्या आनंदाने रायपाटणकर स्वामी यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. रात्री साक्षी विडे भरून कल्याण सोहळ्याची सांगता होते. हा विधी संपल्यावर भक्त देवाला गाऱ्हाणी घालतात. यानंतर येथील करंबेळीच्या डोहात हळदी-बांगड्या व फुलांची परडी सोडली जाते. दुसऱ्या दिवशी मारळ गावात स्थानिक यात्रा भरते. यावेळी तिन्ही पालख्या सावंत खोत यांचे दैवत भैरी सोंबा येथे बसवल्या जातात. या समारंभानंतर गिरिजामातेची पालखी बोंडयेमार्गे परत जात असताना या ठिकाणीही यात्रा भरते. याही ठिकाणी भाविकांची जत्रा फुललेली पाहायला मिळते. प्रसाद घेऊन नंतर पालखीचे घरोघरी दर्शन दिले जाते. आंगवली मठात या यात्रोत्सवाची सांगता होते. या सर्व कार्यक्रमांना परिसरातीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. हा सोहळा तसेच यानिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरूख येधून एसटीच्या गाड्यांची रेलचेलच सुरू असते.
सुंदर, हिरवागार निसर्ग व बारमाही वाहणारा धबधबा यांच्या सौंदर्याने भाविक भारावून जातात. याचमुळे एकदा सौंदर्य आणि पावित्र्य अनुभवलेले भाविक पुन्हा पुन्हा या ठिकाणी उत्साहाने येत असतात.