रत्नागिरीतील खाडी सफारी ठरतेय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू! 
रत्नागिरी

Konkan Tourism : रत्नागिरीतील खाडी सफारी ठरतेय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू!

पर्यटकांची वाढती पसंती; नाचणे-नारायणमळी येथे वन विभाग-कांदळवन कक्षाच्या योजनेमुळे पर्यटनाची संधी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : केरळ, गोव्यामधील कांदळवन सफारीप्रमाणेच रत्नागिरीतही काजळी खाडीच्या बॅकवॉटरमध्ये नाचणे नारायणमळी येथे कयागिंक आणि बोट सफारीला पर्यटकांकडून आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून, रत्नागिरी शहराजवळील या कांदळवन सफारीचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. विविध पक्षी, उदमांजर यासारखी जैवविविधताही या ठिकाणी पर्यटकांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात आहे.

काजळी खाडीच्या बॅकवॉटरमध्येकांदळवनात आढळणारा सोनेरी शाल हा वृक्ष दिसून येतो. महाराष्ट्र राज्याचा अधिकृत राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील एकूण 21 कांदळवन प्रजातींपैकी तब्बल 11 प्रजाती एकट्या नाचणे परिसरातील खाडीत पाहायला मिळतात. याठिकाणी अनेक पक्षांचा अधिवास याठिकाणी पाहण्यास मिळतो. उदमांजराचे दर्शनही याठिकाणी होते.

कांदळवन वृक्षांची तोड रोखण्यासाठी आणि त्याचे संरक्षण व्हावे म्हणून वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्यावतीने नाचणे नारायणमळी येथे काजळी मँग्रोव्हज टुरिझमची सुरुवात करण्यात आली आहे. कांदळवनकक्षाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काजळी मँग्रोव्हज टुरिझमचे दीपक गजने व सहकारी याठिकाणी कयाकिंग व बोट सफारी पर्यटकांना घडवून आणत आहेत. यावर्षी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणच्या किनारपट्टीकडे धाव घेतली असून, यंदाच्या पर्यटन हंगामात कांदळवन (मँग्रोव्हज) पर्यटनाला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. विशेषतः रत्नागिरीतील काजळी मँग्रोव्हज टुरिझमच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी कांदळवन सफारी पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खाडीच्या शांत पाण्यातून या वनसंपदेचा जवळून अनुभव घेता येत आहे.

निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरत असून, नववर्षाच्या निमित्ताने कोकणात येणारा प्रत्येक पर्यटक या आगळ्यावेगळ्या सफारीचा आनंद लुटताना दिसत आहे. यामुळे स्थानिक स्तरावर निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. येथील स्थानिकांच्या हातालाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT