

गणपतीपुळे : दिवाळी पर्यटन हंगामात पर्यठकांची कोकणाला पसंती मिळत आहे. कोकणातील सुंदर समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. गणपतीपुळे येथे गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणांहून आलेले लाखो पर्यटक-भाविकांनी गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींचे दर्शन घेऊन पर्यटनाचा आनंद घेतला. सध्या शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुट्टी असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोकणाकडे वळू लागली आहेत.
कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहे. त्यामध्ये गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे पर्यटन असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, गणपतीपुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गर्दीमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळत आहे.
गणपतीपुळे भेटीवर आलेल्या पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडत असून, त्यांना विलोभनीय समुद्रकिनारा व समुद्राच्या पाण्याचा मोह आवरता येत नाही. अशातच सध्या येथील येथील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जेलीफिशचे अस्तित्व आढळल्याने पर्यटक तसेच भाविकांनी समुद्रात जेलीफिश ज्या ठिकाणी असतील तेथे पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.