Saudi Arabia Blackmail Arrest file photo
रत्नागिरी

Saudi Arabia Blackmail Arrest | सौदीमधून ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; महिलेकडून ६८ लाखांची खंडणी उकळली

पुढारी वृत्तसेवा

खेड : खेड पोलिसांनी सायबर ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठी कारवाई करत सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपीला मुंबईत अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने पीडित महिलेकडून तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गुलाम मोहिद्दीन रफीक परकार (३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने ९ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादी महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ मोबाईलद्वारे काढले. त्यानंतर हे फोटो कुटुंबीयांना दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार पैशांची मागणी केली.

त्याला न्यायालयात हजर केले असता २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची नेक्सॉन कार, ४० हजार रुपये किमतीचा आयफोन, ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. जी. महामुनी व खेड उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, कॉ. विकास पवार, सूरज मोरे व चंद्रमुनी ठोके यांचा समावेश होता.

खंडणी देऊनही पैशांची मागणी

आरोपी सौदी अरेबियामध्ये राहत असताना पीडितेकडून ऑनलाईन पद्धतीने ६८ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. एवढी रक्कम दिल्यानंतरही आरोपीने पुन्हा पैशांची मागणी सुरूच ठेवली. नकार दिल्यानंतर त्याने पीडितेचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवून मानसिक छळ केला. आरोपी जानेवारीपासून सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला होता. १८ एप्रिल रोजी तो कामानिमित्त मुंबईत आल्याची गोपनीय माहिती खेड पोलिसांना मिळाली. तसेच त्याचे मोबाईल लोकेशनही मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खेड पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला मुंबईतून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT