कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत Pudhari Photo
रत्नागिरी

मेंटेनन्स इंजिन अचानक बंद पडले; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावर सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी ऐन सकाळच्या वेळेत रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली. यामुळे गोव्याच्या दिशेने धावणार्‍या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सी.एम. एस. मशीन अचानक बंद

कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सी.एम. एस. मशीन अचानक बंद पडल्यामुळे या भागातून याचदरम्यान धावणार्‍या वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्सप्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली-एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजल्याने अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी 24 तास सतर्क असलेली कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

या गाड्या लेट ...

मुंबई सीएसएमटी- मडगाव (22229) : 2 तास 31 मिनिटे विलंब, पुणे -एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस (22150) : 1 तास 2 मिनिटे विलंब, कोचुवेली - एलटीटी गरीबरथ (12202) :3 तास 52 मिनिटे विलंब, मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051) : 1 तास 47 मिनिटे विलंब, कोचुवेली - पोरबंदर एक्स्प्रेस (20909) : 3 तास 10 मिनिटे विलंब, मडगाव - निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (22413) : 30 मिनिटे विलंब.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT