रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीपाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान रेल्वेने ‘लाँग वीकेंड स्पेशल’ गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे आरक्षण सोमवारी सकाळपासून सुरू झाले आहे.
जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान विशेष फेर्या (TOD åhUOoM Train on demand) चालवल्या जाणार आहेत. यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01149/01150 या विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 9 वाजता दि. 15 तसेच 17 ऑगस्टदरम्यान विशेष गाडी सुटेल. ही गाडी मडगावला दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगाव येथून लो. टिळक टर्मिनससाठी (01155) दि. 16 व 18 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 वाजता सुटून (दुसर्या दिवशीच्या) रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला स्लीपर श्रेणीचे आठ, तर सर्वसाधारण श्रेणीतील तीन डब्यांसह वातानुकूलित डबे मिळून एकूण 21 डब्यांची ही एलएचबी प्रकारातील गाडी असेल.
ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे रोड, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबे घेणार आहे.