मडगाव-नागपूर रेल्‍वे ६ तासांच्या प्रतीक्षेनंतर रत्‍नागिरीकडे मार्गस्‍थ  Pudhari Photo
रत्नागिरी

मडगाव-नागपूर रेल्‍वे ६ तासांच्या प्रतीक्षेनंतर रत्‍नागिरीकडे मार्गस्‍थ

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी-खेड दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळून रेल्वे ठप्प झाली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. राजापूर रोड रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या मडगाव-नागपूर ट्रेन मधील प्रवाशांना राजापूर रोड रेल्वे स्थानकासह येथील महसूल प्रशासनाने मदत पुरवली. ट्रेनमध्ये साडेचारशे प्रवासी होते. सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर ही ट्रेन रत्नागिरीकडे मार्गस्थ झाली.

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर खेड ते दिवाणखवटी या दरम्यान एका बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळून मातीचा मोठा भराव रेल्वेच्या रूळावर पडला. यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली. काही स्थानकांमध्ये रेल्वे गाड्या थांबवाव्या लागल्या. राजापूर रोड स्थानकातही उशिराने दाखल झालेली मडगाव-नागपूर ही ट्रेन येऊन थांबली. मडगाव येथून नागपूरकडे जाणारी ०११४० या स्पेशल ट्रेनचा राजापूर रोड स्थानकात येण्याची वेळ रात्री २२. ४० असून सदर ही गाडी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांनी राजापूर रोड स्थानकात दाखल झाली. या ट्रेनमध्ये सुमारे ४५० प्रवासी होते.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सदर ट्रेन राजापूर स्थानकातच थांबून होती. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या वतीने ट्रेनमधील प्रवाशांना नाष्टा चहापाणी बिस्किटे यांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान येथील महसूल प्रशासनाला माहिती मिळताच राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव आपल्या अधिकाऱ्यांसह राजापूर रोड रेल्वे स्थानकात दाखल झाल्या.

राजापूर रोड स्थानकात अडकून पडलेल्या मडगाव-नागपूर एक्सप्रेस मधील प्रवाशांची त्यांनी विचारपूस केली. महसूल विभागाने देखील अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना पाणी, चहा, बिस्किटे यांचा पुरवठा केला. राजापूर पोलीस ठाण्याने देखील अडकून पडलेल्या प्रवाशांची नोंद घेतली. राजापूरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह राजापूर रोड रेल्वे स्थानकात दाखल झाले.

राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी राजापूर रोड रेल्वे स्टेशन मास्तर मयूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. दरम्यान राजापूर रोड रेल्वे स्थानकामध्ये गोंधळ उडू नये म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी देखील अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना मदत केली. तब्बल सहा तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ११ वाचून ५२ मिनिटांनी मडगाव- नागपूर ही स्पेशल ट्रेन रत्नागिरीकडे मार्गस्थ झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT