रत्नागिरी

Ratnagiri news : लोटे एमआयडीसीतील रासायनिक गळतीने खळबळ; संतप्त ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सहा कारखान्यांना उत्पादनबंदीच्या नोटिसा; कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे नदीच्या दिशेने वाहून गेल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली.

या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राथमिक कारवाई करत सुप्रिया लाइफ सायन्स, स्पॅक कंपनी, विनंती ॲग्रो, अक्वीला कंपनी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एसएमडी स्पेशालिटी या सहा कारखान्यांना उत्पादनबंदीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारखान्यांमधून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कांचन चाळके (माजी सैनिक), शीतल जाधव आणि संजना घाग या सोनगावातील महिला ग्रामस्थांनी प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर केवळ नोटिसा देऊन न थांबता त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाने बजावलेल्या उत्पादनबंदीच्या नोटिसांची प्रभावी अंमलबजावणी होते का आणि दोषींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT