रत्नागिरी : थर्टी फर्स्ट अन् नवे वर्ष साजरा करण्यासाठी दरवर्षी पर्यटक गोव्याला मोठी गर्दी करीत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी पर्यटकांनी निर्सगसंपन्न, शांतता, निळे समुद्र असलेले कोकणाला पसंती दिली असून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरासह देश-विदेशांतून लाखो पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये बीच, आरे वारे, गणपतीमुळे, मालगुंड बीचसह दापोली, गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दीच गर्दी दिसून आली. लाखो पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर 2025 च्या मावळत्या सूर्याला शेवटचा निरोप दिला अन् सकाळी 2026 या नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
नाताळ, थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाचे स्वागत करायचे म्हटले की गोवा असे समीकरण होते. मात्र, यंदा पर्यटकांनी आपली पसंती बदलली असून निसर्गसंपन्न असलेल्या, स्वच्छ, सुंदर निळे समुद्रकिनारे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळ, प्राचीन मंदिरे, कोकणी खाद्य, संस्कृती पाहण्यास पसंती दिली असून रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या जिल्ह्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरी शहरात मांडवी, भाट्ये बीचसह विविध ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना चांगले दिवस आले असून हॉटेल, लॉजिंग, घोडागाडी, वॉटर स्पोर्टस आदी व्यवसाय तेजीत आले आहे. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये एरव्ही कमी गर्दी असल्यामुळे चिंतेत असलेल्या व्यावसायिक, हॉटेल, होम स्टेसह चालकांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
रत्नागिरीतील सर्वात जास्त गर्दी गणपतीपुळे या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाले आहे. याचबरोबर गुहागर, दापोली, राजापूर येथील समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी दिसून आली. थर्टीफर्स्टच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. समुद्रकिनाऱ्यावर, फिक्स पॉईटवर पोलिसांचा फौजफाटा आहे. बुधवारी दिवसभर, सायंकाळी थर्टीफर्स्टला दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्या तपासणी शहरासह ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली.