रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका 'फळांचा राजा' असलेल्या हापूस आंब्याला बसला आहे. वाढता उष्मा आणि बदलत्या हवामानामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात करपला असून, उत्पादनात तब्बल ८० टक्क्यांची प्रचंड घट झाली आहे. बागायतदारांच्या हाती केवळ १० ते २० टक्केच पीक उरल्याने बाजारात हापूसची आवक कमालीची घटली आहे. पुरवठा कमी झाल्याने दराने उच्चांक गाठला असून, सध्या दर्जेदार हापूसच्या एका पेटीसाठी ग्राहकांना ४ हजार ते ९ हजार रुपये मोजावे लागत आहेत. या अस्मानी संकटामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून खवय्यांच्या खिशालाही मोठी झळ सोसावी लागत आहे.
Konkan Hapus Mango news
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका हापूस आंब्याला बसला असून आलेला मोहोर करपल्याने यंदा हापूस आंब्याचे सुमारे ८० टक्के उत्पादन घटले आहे. केवळ १० ते २० टक्के आंबाच वाचवण्यात बागायतदारांना यश आले आहे. परिणामी बाजारात आंब्याची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एका आंबा पेटीची किंमत चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
यंदा सुरुवातीला आंबा झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र त्यात नर मोहोराचे प्रमाण जास्त असल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यानंतर पडलेल्या दवामुळे व वाढत्या उष्म्यामुळे मोहोर काळवंडून गळून गेला. तसेच अतिथंडीमुळे फळगळही मोठ्या प्रमाणावर झाली. या सर्व कारणांमुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली आहे.
हापूसच्या दरात वाढ
सध्या बाजारपेठेत हापूस आंब्याचा घाऊक दर २५० ते ५०० रुपये डझन व किरकोळ दर ७०० ते १८०० रुपये डझन आणि पेटीचा दर ९ हजार ते ४ हजार रुपये (एका पेटीत ४ ते ७डझन आंबे असतात) असा आहे.
दुसरीकडे आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंबा निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे निर्यातीसाठी जाणारा आंबा स्थानिक बाजारात वळवावा लागत आहे. तरीही उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा उपलब्ध होत नाही
यंदा आंब्याचे उत्पादनच कमी झाल्यामुळे बाजारात आंबा मिळत नाही. मागील वर्षी तीनपट उत्पादन झाले होते. मात्र यंदा मोठे नुकसान झाले असून घाऊक बाजारात हा आंबा २५० ते ५०० रुपये व किरकोळमध्ये ७०० ते १८०० रुपये आणि पेटीला ९ ते ४ हजार रुपये दर आहेत.प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार, रत्नागिरी
कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकांपैकी यंदा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन अत्यल्प असून, त्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे.