MLC Election pudhari photo
रत्नागिरी

Konkan MLC Election Candidates 2026 | कोकण मतदारसंघातून 6 जणांचे अर्ज दाखल

Konkan MLC Election Candidates 2026 | महायुतीचे अनिकेत तटकरे, महाविकास आघाडीचे बाळ माने, 'शेकाप'तर्फे अॅड. मानसी म्हात्रे, अरविंद म्हात्रे, अपक्ष जुईली दळवी व अनिल चोपडा रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पाच प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले. यापूर्वी दाखल झालेल्या एका अर्जासह आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार आमनेसामने आले आहेत.

मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंच्या मित्रपक्षांनी आणि नेत्यांनी अपक्ष शड्डू ठोकल्यामुळे या निवडणुकीत 'आघाडी धर्म' पाळला जाणार की बंडखोरी उफाळून येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. बंडखोरीमुळे नाट्यमय वळण या मुख्य लढतीला आता अंतर्गत बंडखोरी आणि मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे नाट्यमय वळण मिळाले आहे.

महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अॅड. मानसी म्हात्रे यांनी अर्ज भरला आहे, तर अरविंद म्हात्रे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्येही शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली महेंद्र दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय अलिबाग येथील अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केला आहे.

४ जूनकडे लक्ष सध्या तरी रिंगणात

सहा उमेदवार दिसत असले, तरी येत्या ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे या तारखेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. महाविकास आघाडीतील शेकाप आपले उमेदवार मागे घेणार का, तसेच महायुतीतील आमदार महेंद्र दळवी आपल्या कन्येची मनधरणी करून तिचा अर्ज मागे घ्यायला लावणार का, हे ४ जूनलाच स्पष्ट होईल. बंडखोरांनी माघार घेतली नाही तर अनिकेत तटकरे आणि बाळ माने यांच्यातील थेट लढत अधिक आव्हानात्मक आणि चुरशीची बनणार आहे. त्यामुळे ४ जूननंतरच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT