रत्नागिरी : आषाढी व मोहरम दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे समाजबांधवांनी तयारी केली आहे. आषाढी वारीसाठी विठुरायाचा नाम जपत, गजर करीत लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले, तर काहीजण रेल्वे, एसटी, खासगी वाहनाने पंढरपुरला रवाना झाले आहेत. ज्यांना वारीला जाणे शक्य नाही अशांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आषाढी वारीचा गजर ही वारी निघणार आहे. विविध तालुक्यातील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी सोय केली आहे. तसेच मोहरम सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून शहरासह ग्रामीण भागात शनिवारी रात्री दोन्ही पंजाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उद्या रविवारी दुपारी बडे पीर, छोटे पीर या मानाच्या दोन्ही पंजाच्या मिरवणुका निघणार आहेत.
आषाढी वारी आणि मोहरम सण रविवारी, 6 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे रत्नागिरी शहर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सामाजिक बांधिलकी, एकोपा वाढावा यासाठी बांधव तयारी करीत आहेत. आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात गेले आहेत. जे वारीला जावू शकले नाहीत त्यांच्यासाठी रत्नागिरी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आषाढी वारीचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. अभंग गात, हरिनामाचा जप करत, विठूनामाचा जयजयकार करत ही वारी भक्तीमय वातावरणात निघणार आहे. तसेच माळनाका, बाजारपेठ, वरवडे, गांर्जिर्डी यासह शहरातील विविध विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात.
मोहरमनिमित्त कोकणातील रत्नागिरी शहरात धनजीनाका, कोकण नगर, राजिवडा भागात यासह लांजा, राजापूर, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड या तालुक्यात मोहरमनिमित्त मानाच्या बडे पीर, छोटे पीर पंजाच्या मिरवणुका निघणार आहेत. तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरासह ग्रामीण भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवारी पाली पाथरट येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेणार आहेत. तसेच दुपारी 12 वाजता शहरातील बाजारपेठ येथील श्री विठ्ठल मंदिर, वरवडे येथील श्री विठ्ठल मंदिरात जावून दर्शन घेणार आहेत.
मोहरम सणानिमित्त मानाच्या दोन्ही पंजाना सजवून मिरवणुका काढण्यात येणार आहे. शनिवार, दि. 5 जुलै रोजी रात्री 9 वाजता मिरवणूक काढण्यात आली, तर रविवारी दुपारी 3.30 वाजता दोन्ही पंजाच्या मिरवणुका निघणार आहेत. ठिकठिकाणी सरबत वाटप होणार आहे. मंगळवारी 8 ते 10 यावेळेत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
आषाढी वारीनिमित्त लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरात सजावट करण्यात आली आहे. रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच दर्शनासाठी काही ठिकाणी मंडपही उभारण्यात आले आहे. रविवारी रत्नगिरी शहरात वारीचा गजर, टाळ-मृदुंगाचा आवाज घुमणार आहे.