चिपळूण : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव. (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Konkan AI Farming News | ‘एआय’ देणार कोकणातील शेतीला बळ

Sharad Pawar on AI in Farming | शरद पवार यांचा विश्वास; प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

AI In Konkan Farming

चिपळूण शहर : रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एआय तंत्रज्ञामुळे कोकणातील शेतीला निश्चितच ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी सोमवारी (दि. 16) सकाळी शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक बाबींसह कोकणात स्थापन केल्या जाणार्‍या एआय तंत्रज्ञानासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर पवार आणि श्री. यादव यांच्यात सविस्तर चर्चा झाली. एआय तंत्रज्ञानामुळे दुग्धोत्पादनासह शेतीपूरक इतर अनेक व्यवसायांना बळ मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास श्री. यादव यांनी श्री. पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांची सोमवारी सकाळी पवार यांच्यासोबत पूर्वनियोजित भेट होती. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीसह संघटनवाढीबाबत चर्चा करून श्री. पवार यांनी श्री. यादव यांच्याकडून आढावा घेतला. याचवेळी श्री. पवार यांनी श्री. यादव यांच्याशी कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी स्थापन केल्या जाणार्‍या एआय सेंटरबाबतही चर्चा केली. शेतीविषयक तंत्रज्ञान, विविध पिके, फळबाग, आणि इतर शेतीपूरक व्यवसायांसह दुग्धोत्पादन वाढीबाबतही यावेळी श्री. पवार यांनी श्री. यादव यांच्याशी चर्चा केली. तसेच, श्री. यादव यांनी कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय यासंदर्भात आणि एआय तंत्रज्ञान यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडलेले एक निवेदन श्री. पवार यांना दिले.

कोकणातील उन्हाळ्यात चार्‍याची समस्या निर्माण होते आणि त्याचा परिणाम इथल्या दुग्धोत्पादनावर होतो. ही बाब श्री. यादव यांनी श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरच त्यासंदर्भात बैठकीचे नियोजन करू, असे सांगत श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रायोगिक तत्त्वावर आम्ही डेअरीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रोत्साहीत करून चारा लागवडीचे प्रयोग यशस्वीपणे करीत आहोत. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चारा लागवडीकरिता प्रोत्साहन दिले गेले, तर चार्‍याची समस्या कामस्वरूपी निकाली निघू शकते, असा मुद्दाही यावेळी श्री. यादव यांनी मांडला. यावेळी प्रशांत यादव यांच्यासोबत चिपळूणमधील उद्योजक रमण डांगे उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चिपळूण दौर्‍यावर आले असता शरद पवार यांनी वाशिष्ठी डेअरीला भेट देऊन प्रशांत यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. सोमवारीच्या बैठकीत पवार यांनी लवकरच कोकणातील दुग्धोत्पादन वाढीसंदर्भात बैठक होईल, असे श्री. यादव यांना सांगितले.

कोकणात शेतीविषयक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे तज्ज्ञ आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती, फळबाग लागवड यांसह शेतीपूरक व्यवसायांमधील अशा प्रयोगशील व्यक्तींना एआयच्या उभारणीत सहभागी करून घेतल्यास कोकणातील शेतकर्‍यांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यादव यांनी श्री. पवार यांच्याशी चर्चेवेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT