MNS - Shivsena UBT Alliance Impact On Konkan Politics
अनुज जोशी
खेड : मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे नुकतेच कौटुंबिक कार्यक्रमा व्यतिरिक्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आयोजित संयुक्त मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे ते त्यांचे राजकीय पक्ष युती करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून शिवसेनेच्या वाटचालीत अंतर्गत झालेल्या फुटीचे थेट पडसाद येथे उमटताना दिसतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, रत्नागिरी, राजापूर हे मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर गुहागर हा मतदार संघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्याकडे आहे. मनसे - सेना युतीची चर्चा सुरू झाल्यापासून कोकणातील दापोली व गुहागर या दोन मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तर रत्नागिरी मधील दापोली मतदार संघात खेड नगर परिषद, दापोली व मंडणगड नगर पंचायत यांचा समावेश आहे. तर खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गट या मतदार संघात आहेत. तसेच गुहागर मतदार संघात खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गट गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाले आहेत.
त्यामुळे गुहागर मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर चष्मा असला तरी दापोली मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. तसेच खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे मनसेचे नेते असून त्यांचा प्रभाव येथील शहरी भागामध्ये दिसून येतो. त्यामुळे ठाकरे शिवसेना व मनसे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी येथील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुप्त बैठकांतून आगामी निवडणुकांच्या व्यूहरचनेची तयारी देखील सुरू केली असल्याची चर्चा आहे. राज आणि उद्धव यांच्या ५ जुलै चा मोर्चा घोषित झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश मागे घेतल्यानंतर खेडमध्ये मनसे व उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र केलेला जल्लोष आगामी राजकीय वाटचालीचे चित्र स्पष्ट करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.