खेड : शहरातील एसटी स्टँड परिसरातील श्री स्वामी समर्थ स्टॉल या दुकानाला रविवारी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे शेजारील दुकानाचे मोठे नुकसान टळले.
या बचावकार्यात फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वाहन चालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ व सुरज शिगवण यांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.
घटनास्थळी श्री कुंदन सातपुते, श्री आनंद खेडेकर तसेच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी मदतीसाठी उपस्थित होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.