Sangli Fire : ईश्वरपुरात दोन दुकाने जळून खाक

लाखो रुपयांचे नुकसान; मुख्य बाजारपेठेत आग लागल्याने शहरात खळबळ
Sangli Fire News
ईश्वरपुरात दोन दुकाने जळून खाक
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खाद्यपदार्थांच्या दोन दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली असून दुकानदार राजेंद्र ढबू व संतोष ढबू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गांधी चौकात ढबू बंधूंचे चिरमुरे, फरसाण, चिवडा, चॉकलेट, पत्रावळी व प्लास्टिक पेल्यांचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर आणि पाठीमागे मालाचे गोडाऊन आहे. शनिवारी राजेंद्र ढबू यांचे दुकान बंद होते, तर संतोष ढबू यांचे दुकान सुरू होते. दुपारी संतोष यांच्या पत्नीला वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून याची माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुकानातील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. वरच्या दोन्ही मजल्यांवर पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, तंबाखू यांसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट पसरले.

आगीची माहिती मिळताच ईश्वरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच ईश्वरपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेत चौकातील गर्दीला पांगवले. आगीची भीषणता पाहून आष्टा नगरपालिका, राजारामबापू साखर कारखाना, हुतात्मा कारखाना यांचे अग्निशमन दल आणि खासगी पाण्याच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी दिलीप कुंभार, चालक विशाल मोरे, शरद माटेकर, गणेश कांबळे, किरण पाटील, अक्षय खवळे, रवी पाकरे व अनिल मदने यांनी नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीच तासाच्या अथक्‌‍ प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, नगरसेवक अमित ओसवाल, एल. एन. शहा, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सोमनाथ फल्ले, आयुब हवलदार, मानसिंग पाटील, ॲड. मनीषा रोटे, कमल पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ढबू कुटुंबीयांना धीर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news