खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम आहे. नदीची पाणीपातळी हळूहळू कमी होत असली तरी शहरातील बाजारपेठ आणि सखल भागांमध्ये अजूनही पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रविवारी जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरल्याने अनेक दुकाने पाण्याखाली गेली. जवळपास १५ तासांहून अधिक काळ बाजारपेठ पाण्याखाली असल्याने व्यापारी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. निवाचा चौक परिसरातही अद्याप पुराचे पाणी कायम असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूरस्थितीमुळे खेड शहराचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच खेड–दापोली मार्गावरील वाहतूकही बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिक अद्याप पूरग्रस्त भागात अडकले असून प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पुढे सरसावले असून अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरू आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी आता हळूहळू घटत असली तरी बाजारपेठेतील पाणी पूर्णपणे ओसरण्यास आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.