Mumbai Goa Highway Accident
खेड : गणेशोत्सवासाठी चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या तरुण-तरुणीवर रविवारी सकाळी काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर रविवारी सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला.
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती महामार्गालगत असलेल्या तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली अक्षता अरविंद कवडे (वय २८, रा. चिपळूण) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसऱ्या एका घटनेत रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या ईर्टिगा कारला अचानक भीषण आग लागली. आगीने काही वेळातच संपूर्ण वाहनाला वेढा घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेळीच कारमधून बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच पेण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचल्याने मोठा अनर्थ टळला.