Mumbai-Goa Highway Damaged  Online Pudhari
रत्नागिरी

Mumbai-Goa Highway Damaged | खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई-गोवा महामार्ग खचला, जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी

Mumbai-Goa Highway Damaged | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटदरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्या असून वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai-Goa Highway Damaged

मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटदरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्या असून वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

मौजे कळबनी बुद्रुकजवळील वाळजवाडी येथे असलेला पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या भेगा पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे.

या महामार्गावर सुरू असलेल्या चार पदरी रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले असावे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एवढी गंभीर स्थिती असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आपत्कालीन यंत्रणा अद्याप घटनास्थळी पोहोचलेली नाही, हे चिंतेचे कारण ठरत आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना अतिशय काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, तालुक्यातील जगबुडी नदीने ६.४० मीटरची धोकादायक पातळी गाठली असून, अनेक परिसर जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील २४ तासांत खेडमध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर हंगामातील एकूण पावसाचा आकडा ७५० मिमी पार झाला आहे.

पावसामुळे पाणीपुरवठा व्यवस्थाही कोलमडली आहे. जगबुडी नदीखालून जाणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटल्याने खेड शहरातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. नदीची वाढलेली पातळी आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, यामुळे दुरुस्तीचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.

अशातच, श्री खेडजाई रेडजाई मंदिर परिसरातून सुसेरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर नारिंगी नदीने रस्ता ओलांडल्याने नागरिक अडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सुदैवाने, १६ जून रोजी एक महिला अडकली असताना 'विसर्जन कट्टा' टीमने तातडीने धाव घेत तिचा जीव वाचवला.

एकूणच खेड तालुक्यात पूरजन्य परिस्थिती गंभीर बनली आहे. हवामान विभागाने अधिक पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी घरातच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT