Ratnagiri  
रत्नागिरी

Ratnagiri Election | खेडमध्ये प्रभाग ५-ब मध्ये मोठी राजकीय घडामोड; सुनीता खालकर यांची उमेदवारी माघार

Ratnagiri Election | खेड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 5-ब मध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ratnagiri Election | खेड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 5-ब मध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सुनीता सागर खालकर यांनी मंगळवारी (दि. 25) सायंकाळी उशिरा आपली उमेदवारी मागे घेतली. या अनपेक्षित निर्णयामुळे प्रभागातील निवडणूक समीकरणे पूर्णपणे बदलली असून, शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा मार्ग अधिक सुलभ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकासकामांचा प्रभाव

सुनीता खालकर यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शहरातील विविध प्रकल्प, रस्त्यांचे काम, पाणीपुरवठा सुधारणा आणि इतर विकासासाठी मंत्री कदम यांनी घेतलेली मेहनत पाहून आपण स्वतःहून माघार घेत आहोत.”

त्यांनी या निर्णयात कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराला शंभर टक्के पाठिंबा देणार असल्याचे प्रतिज्ञापत्रासह जाहीर केले.

उद्धव ठाकरेंच्या गटासाठी मोठा धक्का

या राजकीय घडामोडीचे विशेष महत्त्व असे की, हा प्रभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांचा स्वतःचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील अधिकृत उमेदवाराची माघार ही पक्षासाठी मोठा धक्का समजला जात आहे.

या निर्णयामुळे प्रभाग ५-ब मधील निवडणूक आणखी चुरशीची होणार असून, मतदारांमध्येही या बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या काहीच दिवस आधी उमेदवार माघार घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या संघटनात्मक तयारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिंदे गटात आनंदाचे वातावरण

सुनीता खालकर यांच्या या निर्णयाने शिवसेना (शिंदे गट) शिबिरात मोठा आनंद व्यक्त होत आहे. माघार जाहीर होताच शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.

खेड शहरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात माजी सभापती अरुण कदम, शैलेश कदम, अजय माने, कौशल चिखले आणि किरण डफळे यांनी सुनीता खालकर यांचा सत्कार करत त्यांना अधिकृतपणे पक्षात सामील करून घेतले. या प्रसंगी स्थानिक पातळीवर यामुळे विकासाला वेग मिळेल, असेही मत व्यक्त करण्यात आले.

निवडणूक समीकरणे बदलणार

प्रभाग क्रमांक 5-ब मध्ये आता शिंदे गटाचा उमेदवार अधिक मजबूत स्थितीत आला आहे. विरोधकांच्या मते, खालकर यांनी माघार घेतल्यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी उघड झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे म्हणणे आहे की, “विकासाच्या राजकारणाला मतदारांनी साथ दिली पाहिजे आणि ही माघार त्या दिशेने सकारात्मक पाऊल आहे.”

प्रभागातील मतदारही आता नव्याने तयार झालेल्या राजकीय स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीत कोणत्याही क्षणी समीकरणे बदलू शकतात, पण खालकर यांच्या निर्णयामुळे प्रभाग 5-ब ची लढत अधिक रोचक बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT