खेड : खेड नगर परिषद निवडणुकीत सायंकाळी 3.30 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार 62.53 टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण 13,995 मतदारांपैकी पुरुष 3386 तर महिला 3961 असे एकूण 7,347 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरात महिलांचा उत्साह दिवसभर ठळकपणे जाणवत होता.
मतदानास सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली. 9.30 वाजेपर्यंत 11 टक्के, 11.30 वाजेपर्यंत 28 टक्के तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 41.34 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वेग किंचित मंदावला, तरीही नागरिकांनी उत्साह टिकवून ठेवला. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर सोनवणे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव रोडगे यांनी दिवसभर मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.
तरीही सुरुवातीच्या काळात मतदार याद्यांमधील विसंगतीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मतदार याद्यांमध्ये दोनवेळा केलेल्या बदलांमुळे तसेच फेर प्रभाग रचनेनंतर नव्याने उभ्या करण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदार याद्या विभागल्या गेल्याने अनेकांना आपले नाव शोधण्यासाठी अर्धा तासापर्यंत रांगेत थांबावे लागले.
गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, सौ. श्रेया कदम यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मतदान केंद्रांना भेट देऊन कार्यकर्त्यांना व मतदारांना उत्साह दिला. खेड शहरातील 10 प्रभागांमध्ये एकूण 20 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेचा शेवट सायंकाळी 5.30 वाजता झाला. मतदानानंतर काही हौशी कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याचेही निदर्शनास आले.