हिंदू संघटनांचा एसपी कार्यालयावर विराट मोर्चा Pudhari File Photo
रत्नागिरी

गोवंश हत्येविरोधात रत्नागिरीत एल्गार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये गोवंशाचे शीर आढळल्यानंतर हे कृत्य करणार्‍या व्यक्तीला 48 तासानंतर ही पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त झालेल्या सकल हिंदू, हिंदू सामाजिक संघटनांनी रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

पोलिस अधीक्षक या मोर्चाला सामोरे गेल्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणात चालढकलपणा केला जात असल्याचा आरोप करीत हिंदू समाज व संघटनांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गावर जेलनाका येथे रास्ता रोको केला. भरपावसात भिजत ठिय्या मांडल्याने तब्बल एक तासाहूने अधिक काळ मार्ग रोखून धरण्यात आला. या दरम्यान संशयिताला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

दोन दिवसापूर्वी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे एका लहान गोवंशाचे शीर मुख्य रस्त्यावर आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी रात्री हिंदू सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ग्रामीण पोलीस स्थानकात ठिय्या मांडून आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपाने नेते निलेश राणे यांनी 48 तासात आरोपीला अटक करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. 48 तासांची मुदत संपल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची घोषणा केली नाही. त्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजता शहरातील मारुती मंदिर येथून हिंदू सामाजिक संघटनांच्या विराट मोर्चाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही हजारो हिंदू बंधूभगिनी, वृद्ध, तरुण- तरुणी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मारुती मंदिर इथून निघालेला मोर्चा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. पोलिसांनी जिल्हा विशेष कारागृहाजवळच मोर्चेकरांना रोखून धरले.

सर्वप्रथम अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर हे मोर्चेकरांना सामोरे गेले. पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी सोडण्याची तयारी पोलीस अधिकार्‍यांनी दर्शवली. परंतु निलेश राणे यांनी याला विरोध केला. जे होईल ते सर्वांसमक्ष होईल. पाचजण येऊन चर्चा करणार नाहीत. पोलीस अधीक्षकांनी सर्वांसमक्ष येवून वस्तुस्थितीचे कथन करावे, अशी मागणी केली.

मोर्चेकरांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मोर्चेकरांना सामोरे गेले. गोवंश शीर प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केले आहे, असे कुलकर्णी यांनी मोर्चेकरांना सांगतात, निलेश राणे यांनी संशयीताचे नाव जाहीर करा, त्याला न्यायालयात हजर केले का? अशा प्रश्नांचा भडीमार केला. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलीस कोणाचीही गय करणार नाहीत. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.

पोलिस अधीक्षकांच्या घोषणेनंतरही निलेश राणे यांच्यासह हिंदू सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. जोपर्यंत आरोपीला अटक करून न्यायालयास हजर करत नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर मोर्चेकरांनी आपली आंदोलनाची दिशा बदलली. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळून आंदोलक थेट जेलनाका येथील मुख्य चौकात आले. माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह हिंदू संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी चौकात ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णत: बंद ठप्प झाली. यामध्ये एसटी बससह दुचाकी, चारचाकी वाहन चालक अडकून पडले होते. दुपारी दीड वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. यादरम्यान शेकडो पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. तब्बल तासभर ठिय्या आंदोलन सुरू होते. उपस्थित हिंदू बांधवांनी भजनाचा गजर सुरू केल्याने परिसराला अध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. याच कालावधीत पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी निलेश राणे यांना दिली. त्यामुळे आंदोलकांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली.

संशयित आरोपीला पोलीस कोठडी झाल्यानंतर नीलेश राणे यांनी उपस्थित हिंदू बांधवांशी संवाद साधला. आपण ज्यासाठी आलो होतो. तो विषय यशस्वी करण्यात आपल्याला यश आले आहे. आपण एकजूट दाखविली म्हणूनच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अशी एकजूट कायम ठेवा. जिल्ह्यातील अनधिकृत कत्तलखाने पुढील 3 दिवसात पोलिसांनी उध्वस्त करावे. जिल्ह्यात कत्तलखाने कुठे आहेत याची माहिती पोलिसांना आहे. त्यांना माहिती नसेल तर आम्ही माहिती देऊ. प्रामुख्याने रत्नागिरीसह उक्षी, चिपळूण मधील गोवळकोट येथे अशा प्रकारचे उद्योग सुरू आहेत. हे अड्डे पोलिसांनी तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन ते उध्वस्त करू याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील असा इशारा निलेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे.

घटनेच्या सखोल तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना

गोवंश हत्ये प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्याची घोषणा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली. त्यामुळे ‘एसआयटी’च्या चौकशीतून काय बाहेर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संशयिताला अटक

गुरुवारी रात्री 9 वा. सुमारास शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील रस्त्यावर आढळून आलेल्या गोवंशीय शीर आढळल्याप्रकरणी संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शादाब गनी बलबले (रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT