रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथील एका गॅरेजसमोर अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी नेपाळी माणसाचा जागीच मृत्यू झाला. अंतराम मंगलरामद थारू (50, मूळ रा.पथरैया वार्ड क्र.3 अमौरी पोलिस स्टेशन टिकापूर, जि. कैलाली, नेपाळ) असे त्याचे नाव आहे. अपघात रविवारी (7 डिसेंबर) सकाळी 5.30 वा.सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुनिया जोखनलाल चौधरी (55, मूळ रा. पथरैया वार्ड क्र.3 अमौरी पोलिस स्टेशन टिकापूर,जि.कैलाली, नेपाळ) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी मयत अंतराम थारु आणि त्याच्यासोबत खडगबहाद्दूर हरिराम चौधरी, रामशरण, हिंगुलाल थारु हे सर्वजण निवळी येथील ईश्वर धाब्यासमोरील रस्ता ओलांडून निवळी ते हातखंबा जाणार्या रस्त्यावर येत होते.
ते हातखंबा तिठा येथील गॅरेजसमोर आले असता निवळी बाजुकडून येणार्या राखाडी रंगाच्या कारने अंतराम थारु याला धडक दिली. त्यामुळे अंतराम रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर अज्ञात कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन कदम करत आहेत.