गुहागर ः नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेले युतीचे राजेंद्र भागडे व त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे उमेदवार सौरभ भागडे. 
रत्नागिरी

Guhagar Nagar Panchayat Election 2025 : गुहागर न. पं.वर प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष

शिवसेना-भाजप युतीच्या मनोमिलनंतरचे फलित, उबाठाच्या तीन उमेदवारांचा निसटता पराभव

पुढारी वृत्तसेवा

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपलाच नगराध्यक्षपद मिळाले पाहिजे असा पराकोटीचा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी धरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी शिवसेना नेते शशिकांत शिंदे युतीचा फतवा घेऊन आले, जागा वाटप निश्चित झाले. शिवसेना व भाजपचे मनोमिलन झाल्यावर सर्व कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. त्याचा परिणाम म्हणून प्रथमच भाजपच्या उमेदवार निता मालप यांनी निर्विवाद बहुमत मिळवत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

नगरपंचायतीच्या 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत उमेश भोसले, अमोल गोयथळे व वैशाली मालप हे नगरसेवक होते. हे तिन्ही नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांपैकी अमोल गोयथळे आणि उमेश भोसले हे दोन्ही नगरसेवक विजयी झाले आहेत. तर मागील कारकीर्दीत बांधकाम सभापती असलेल्या वैशाली मालप यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे.गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग 8 मध्ये 231 मतदारांनी मतदान केले होते. या 231 मतदारांनी नोटाला (वरीलपैकी एकही नाही) नाकारले आहे. या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाच्या तीन उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये प्रभाग क्र. 7 मधील प्रगती वराडकर 6 मतांनी, प्रभाग क्र. 8 मधील रिया गुहागरकर या 5 तर प्रभाग 16 मधील उमेदवार राज विखारे 4 मतांनी पराभूत झाले.

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच मनसेचा उमेदवार विजयी झाला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर गुहागर तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीमध्ये मनसेने निर्विवाद बहुमत मिळवले होते. तर काही ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार निवडून आले होते. मात्र 2009 नंतर कधीही मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरली नव्हती. गुहागर शहरात मनसेचे कार्यकर्ते काम करत होते. मात्र, त्यांनाही निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. गुहागर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील मनसे शिवसेनेच्या युतीचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांनी केला. गुहागर नगरपंचायतीमध्ये 2 जागा मनसेला देऊ केल्या. दुर्दैवाने मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या दोन उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. तरीही प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. त्याचे फळ त्यांना प्रभाग 4 मधून कोमल जांगळी यांच्या विजयाने मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT