रत्नागिरी : ढाक्कू... माकुम..ढाक्कू... माकुम, गोविंदा रे गोपाळा, अशा डीजेच्या तालावरील गाण्यांची धूम, हंड्या बांधण्यासाठी आयोजकांकडून उपलब्ध करण्यात आलेल्या अवाढव्य अशा क्रेन, डी. जे., स्टेज आदीच्या तयारीची दुपारपर्यंत लगबग पाहायला मिळाल्यावर शनिवारी संध्याकाळी मात्र हंड्या पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गोविंदा पथकांची प्रचंड वर्दळ आणि हंड्या फोडण्यासाठी गडबड होती. अखेर रात्री उशिरा राजकीय प्रतिष्ठेच्या हंड्यांसह जिल्हाभरातील 251 सार्वजनिक, तर 2 हजार 612 खासगी दहीहंड्या फोडून दहीहंडी हा उत्सव साजरा झाला. यावेळी अनेक गोविंदा पथकांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली.
गतवर्षीपेक्षा यावर्षी दहीहंड्यांमध्ये मोठी घट झाली होती. यासाठी थरांवर थर लावण्याचा सराव गेले महिनाभर सुरू होता. काही राजकीय नेत्यांनी देखील स्पॉन्सर केलेली गोविंदा पथके अनेक ठिकाणी दिसत होती. 7 ते 8 थर लागतील एवढ्या उंचीवर हंड्या बांधण्यात आल्या होत्या. यंदा राजकीय कल्लोळ सुरू असल्यामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्र किनारी उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी ही यंदाच्या उत्सवात लक्षवेधी ठरली होता तर मारुती मंदिर येथे उबाठा गटाने प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.
उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठे स्टेज, हंडी बांधण्यासाठी आणलेल्या क्रेन, डीजे सिस्टीम आदीमुळे दहीकाल्याच्या या उत्सवात मोठी भर पडली. नव्या जुन्या विविध गाण्याच्या तालावर गोविंदा थिरकत पाण्यांचा मारा सहन करीत थरावर थर लावत होते. जिल्हभरात सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गोविंदा पथकांनी सहा ते सात थर लावन सलामी देत बक्षिसांची लयलूट केली. मानाच्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या अनेक हंड्या रात्री उशिरापर्यंत देखील फुटल्या नव्हत्या. पावसानेही आज दहीहंडी सणाच्या दिवशी हजेरी लावल्याने गोविंदांच्या आनंदाला अधिकच भरते आले होते.