

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर नातूनगर हद्दीवरील मोरीवर काँक्रिटपट्ट्यांना जोडण्यासाठी दोन्ही बाजूला डांबरी जोडपट्टा मारण्यात आला आहे. मारलेला जोडपट्टा खोल खड्डेमय झाला आहे. वेगाने येणार्या वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी वाहने उंच उडतात. त्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवर नियंत्रण राहत नसल्याने वाहने अचानक वेडीवाकडी वळतात व दुभाजकावर किंवा साईडच्या संरक्षक कठड्यावर आदळतात व मोठे अपघात होत आहेत.
या पट्ट्याचा वाहनचालकांना, प्रवाशांना त्याचबरोबर रस्त्याने चालणार्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. सन 2023 पासूनचा हा जोडपट्टा अनेक वाहनचालक व प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. तरीही या गंभीर मुद्याकडे महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी पाठ फिरवून बसले आहेत. 24 फेब्रु. 2023 या पट्टयावर एका वेगनर कारचा अपघात झाला होता. त्यावेळेपासून बोरघरचे माजी सरपंच, भाजपा नेते उदय बोरकर यांनी या जोडपट्ट्याची योग्य बांधणी करणेसाठी मागणी करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी याच पट्ट्यावर एका स्वीफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाला. त्यानंतर दिनांक 10 ऑगस्टला हुंडाई कारचा अपघात होवून कार उंच उडून महामार्गाच्या पलीकडच्या लेनवर जाऊन पडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने दुस-या लेनवरून कोणतीही वाहने त्यावेळी नव्हती. गणपती सण काहीच दिवसांवर आला आहे. त्यामुळे सणासाठी चाकरमान्यांची हजारो छोटी मोठी वाहने वेगाने महामार्गावरून धावणार आहेत. परंतु, बोरघर नातूनगर हद्दीवरील खड्डेमय डांबरी जोडपट्टा अपघाताचा सापळा बनून वाहनांच्या समोर आडवा असल्याने चाकरमान्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जोडपट्ट्याची त्वरीत योग्यरित्या बांधणी करावी. तसेच केवळ बोरघर स्टॉपवरच क्रॉसिंग ठेवल्याने आणि सर्व्हिस रोड नसल्याने नातूनगर ते बोरघर त्याचबरोबर चिंचवली फाटादरम्यान वाहनचालक वाहने उलट्या मार्गाने हाकत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या दरम्यान सर्व्हिस रोड त्वरित बनवण्यात यावा,अशी मागणी उदय बोरकर यांनी केली आहे. संबंधित खात्याने याची दखल न घेतल्यास बोरघर, नातूनगर व चिंचवली नागरिकांसह रास्ता रोको अंदोलनाचा इशारा बोरकर यांनी दिला आहे.