Fishing  Pudhari News Network
रत्नागिरी

Dapoli Fishing | गणेशोत्सवासाठी कोकणात मासेमारी ठप्प; कोळी बांधवांच्या नौका किनाऱ्यावर विसावल्या

Dapoli Fishing | कोळी बांधवांची मासेमारीला काही दिवसांची विश्रांती बंदरे, किनारे शांत; घराघरांत भक्तीचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

दापोली : प्रवीण शिंदे
कोकणाच्या मातीत गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना समुद्रकिनाऱ्यावर मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. वर्षभर समुद्राशी झुंज देत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या नौका सध्या किनाऱ्यावर विसावल्या आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी मासेमारीला काही दिवसांची विश्रांती देत कोळी बांधव कुटुंबासमवेत गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी होत आहेत. त्यामुळे अन्य वेळी मासेमारीच्या नौकांनी गजबजलेली बंदरे आणि किनारे सध्या शांत दिसत आहेत.

गणेशोत्सव कोकणवासियांसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून घराघरांत जपली जाणारी परंपरा आहे. चाकरमानी गावाकडे परतले आहेत, घरे सजली आहेत आणि गणरायाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले आहे. या उत्सवात समुद्राशी नाते जोडलेल्या कोळी समाजाचाही उत्साह तितकाच ओसंडून वाहत आहे.

गणपतीची प्रतिष्ठापना, पूजन, आरती, नैवेद्य तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी यासााठी कोळी बांधवांनी मासेमारीला विराम दिला आहे. यामुळे दापोलीसह कोकणातील विविध किनारपट्टी भागात मासेमारीच्या नौका समुद्रात न जाता किनाऱ्यावर उभ्या असल्याचे चित्र आहे. समुद्राच्या लाटांशी रोजची झुंज देणाऱ्या या नौका सध्या बाप्पाच्या स्वागताची साक्ष देत शांतपणे विसावल्या आहेत.

श्रद्धेपुढे व्यवसाय दुय्यम

गणेशोत्सवातील काही दिवस मासेमारी बंद ठेवणे म्हणजे कोळी बांधवांसाठी उत्पन्नावर परिणाम सहन करणेही आहे; मात्र वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जपण्यासाठी हा समाज श्रद्धेने व्यवसायाला विश्रांती देतो. घरातील गणरायाच्या पूजेत सहभागी होताना समुद्रापासून काही दिवस दूर राहण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

किनाऱ्यावर रंगेत उभ्या असलेल्या मासेमारी नौका सध्या केवळ विश्रांतीचे प्रतीक राहिलेल्या नाहीत, तर त्या कोळी समाजाची गणरायावरील श्रद्धा, कुटुंबाशी असलेले नाते आणि कोकणाच्या परंपरेची साक्ष देत आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह संपल्यानंतर पुन्हा या नौका समुद्राच्या लाटांवर स्वार होतील आणि कोळी बांधवांची जीवनगाथा पुन्हा समुद्राच्या अथांग पाण्यात सुरू होईल.

कुटुंबासाठी वेळ

मासेमारी हा कोळी बांधवांचा पारंपारिक व्यवसाय. समुद्रात मासळीच्या शोधासाठी दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या या समाजासाठी प्रत्येक दिवसाची कमाई महत्त्वाची असते; मात्र गणेशोत्सवाच्या दिवसांत व्यवसायापेक्षा श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबासोबतचा आनंद यांना प्राधान्य दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT