गुहागर : मोन्था वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील 7 मच्छीमार नौकांशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन बोटी आणि सुमारे 30 ते 40 खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह रायगडमधील करंजा, मढ, न्हावा शेवा, वर्सोवा बंदरात गेले तीन दिवस चिंतेचे वातावरण होते. 30 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता 4 नौका करंजा बंदराकडे निघाल्याची माहिती मिळाली. 31 ऑक्टोबरला सकाळी दोन बोटी कुलाबा बंदरात पोचल्या. बेपत्ता सर्व बोटी बंदरात आल्या व सर्व बोटींवरील खलाशी सुखरुप असल्याची माहिती 31 ऑक्टोबरला दुपारी मिळाली.
तटरक्षक दल, नाविक दल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी आदींकडून सतत प्रयत्न सुरु होते. शुक्रवारी सकाळी चार बोटींशी संपर्क झाला. या बोटींवर काम करणारे खलाशी सुखरूप असल्याचे समजले आणि कोळीवाड्यातील चिंता दूर झाली. बेपत्ता बोटींशी संपर्क साधण्यासाठी तटरक्षक दल, नौदल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू होते.
गेले दोन दिवस अरबी समुद्रात मोन्था चक्रीवादळामुळे गंभीर स्थिती आहे. अजून दोन दिवस हे वादळ रहाणार आहे. वादळ येणार्यापूर्वी 25 ऑक्टोबरच्या दरम्यान वर्सोवा, मढ, न्हावाशेवा, करंजा या मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील सुमारे 20 ते 30 मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या होत्या. संबंधित नौकांना वादळाचा इशारा मिळाल्यावर सुरक्षित बंदरात जाण्यासाठी या नौका निघाल्या. मात्र, 7 बोटींना परतीच्या प्रवासात वादळाने घेरले. 26 ऑक्टोबरला या नौकांशी संपर्क तुटल्यानंतर बंदर विभाग, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांना स्थानिक पातळीवरुन कळवण्यात आले.
सागरी सीमा मंचचे कार्यकर्ते, करंजा सोसायटीमधील पदाधिकारी यांनी तटरक्षक दल, नौदल, मत्स्य विभागाचे मंत्री नितेश राणे, सहाय्यक आयुक्त देवरे यांच्याशी संपर्क साधुन पाठपुरावा सुरु केला. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी देखील शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणांकडे पाठपुरावा करत होते. दरम्यान 29 तारखेला रात्री एका बोटीवर संपर्क साधण्यात तटरक्षक दलाला यश आले. मात्र 6 बोटींशी संपर्क होत नव्हता. नेमक्या याच बोटींवर गुहागर तालुक्यातील खलाशी होते. त्यामुळे साखरी आगर, धोपावे, वेलदूर, नवानगर येथील कोळीवाड्यातून चिंतेचे वातावरण होते.