

गुहागर : आंतराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी शहरातील 7.5 कि.मी.चा समुद्रकिनार्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. एकूण 3 टन 200 कचरा किलो संकलित करण्यात आला. यामध्ये शहरातील विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मिळून 800 हून अधिक जणांचा सहभाग होता.
नगरपंचायतीचे कर्मचारी शहरातील नियोजित 7 ठिकाणी पोहोचले होते. तेथे स्वच्छतेसाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याचे वितरण केले. त्यानंतर सर्वांनी समुद्रकिनारा, सुरूबन याची स्वच्छता केली. कचरा संकलन करतानाच काच, रबर आणि अन्य प्लास्टिक कचरा अशी वर्गवारी करण्यात आली. सर्व ठिकाणी संकलित झालेला कचरा नगरपंचातयीच्या कचरा संकलन वाहनांमधून कचरा प्रकल्पापर्यंत नेण्यात आला. एकूण 3 टन 200 किलो कचरा संकलित करण्यात आला.
या नियोजनासाठी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांची 10 सप्टेंबरला एक विस्तृत सभा घेतली. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे आले होते. या सभेत गुहागरच्या 7.5 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनार्याचे भौगोलिक क्षेत्रानुसार 7 भाग करण्यात आले. सभेत सहभागी झालेल्या प्रत्येकी 2 ते 3 नागरिकांना या भागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. शहरवासीयांना नोंदणी करण्यासाठी व आपल्याला कोणत्या भागात स्वच्छता करायला आवडेल, तो भाग निवडण्यासाठी नगरपंचायतीने गुगल फॉर्मची निर्मिती केली होती. या सुविधेचा फायदा सुमारे 200 नागरिकांनी घेतला. शहरातील सर्व बचतगटांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांनाही भाग वाटून देण्यात आले. प्रत्येक भागात नगरपंचायत कर्मचार्यांची विभागणी केली.
शहरातील दुर्गादेवी देवस्थानने सुमारे 500 हॅण्डग्लोव्हज, कचरा संकलनासाठी पिशव्या, मास्क, स्वच्छता मोहीम संपल्यावर स्वयंसेवकांना चहा व नाश्ता याची व्यवस्था दुर्गादेवी देवस्थानने केली होती. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, दुर्गादेवी देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान, सागरी सीमा मंच, अनुलोम, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर तालुका पत्रकार संघ, रानवीतील मायनाक भंडारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच खरे ढेरे महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.