3 ते 5 ऑक्टोबर हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा
वादळी वारे व उंच लाटांच्या शक्यतेमुळे समुद्र खवळलेला
मच्छीच्या दरात नेहमीपेक्षा दुपटीने वाढ
रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रातील धोक्याच्या इशार्यामुळे पारंपरिक नौका मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीत. त्यामुळे मासळी बाजारांमध्ये माशांचे दर वधारलेले आहेत. मात्र नवरात्रौत्सव व दसर्यानंतर उपवास सुटल्याने चढे दर असले तरी मासळी बाजारांत रविवारी ग्राहकांची गर्दी होती. ताजी मासळी नसल्याने मिरकरवाडा बंदरात बर्फात साठवून गोठवलेली मासळी विकली जात होती.
3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्याने मच्छीमार नौका बंदरातच उभ्या होत्या. याचा परिणाम म्हणून बंदरावर गोठवलेली मासळी उपलब्ध होती. जी काही थोडीफार ताजी मासळी मिळाली तिचा दर फारच चढा होता.
आठवड्यापूर्वी जी छोटी सुरमई 150 ते 200 रुपये किलो दराने मिळत होती ती सुरमई 500 रुपये दराने विकली जात होती. मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर 500 रुपये होता तो आता 800 रुपये इतका झाला होता. पापलेट 500 ते 600 रुपये किलो दराने मिळत होते त्याचा एक किलोचा दर 1 हजार रुपये इतका होता.
लहान सरंग्याचा दर 250 रुपयांवरून 400 रुपयांवर तर मोठ्या सरंग्याचा दर 600 रुपये किलो इतका होता. बांगडे मात्र 150 रुपये किलो दराने तर सौंदाळे 250 रुपये किलो दराने मिळत होते. जी कोळंबी 250 रुपये किलो दराने मिळायची त्या कोळंबीचा दर 500 ते 600 रुपये पर्यंत पोहोचला होता. परंतु, उपवास सुटल्यामुळे माशांच्या चढ्या दराचा ग्राहकांवर काही परिणाम झाला नाही. बाजारपेठेतील मासळी मार्केटसह राजीवडा, मिरकरवाड्यातील मासळी बाजारांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.