खेड : येथील नगर परिषद गौरवाने मिरवत असलेल्या शिवतर गावाच्या शौर्यपरंपरेचे प्रतीक ठरणारे लढाऊ विमान स्मारक. सात वर्षांपूर्वी नगर परिषदेला सुपूर्द केलेले हे खरेखुरे लढाऊ विमान आजही अपूर्ण स्मारक म्हणून पडून आहे. स्थानिक नागरिक आणि माजी सैनिकांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शिवतर गावातून तब्बल 234 जवानांनी सहभाग नोंदवला. अनेकांनी प्राणार्पण केले. त्यांच्या शौर्याची आठवण जतन करण्यासाठी 2018 मध्ये माजी सैनिकांनी केंद्र सरकारमार्फत मिग विमानाची मागणी केली होती. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून विमान नगर परिष्ादेला मिळाले आणि संपूर्ण मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या. नगर परिषदेने स्मारकासाठी 38 लाख रुपये मंजूर करून चौथरा उभारला आणि विमान बसवले. मात्र पुढची सर्व कामे संरक्षणात्मक शेड, माहिती फलक, प्रकाशयोजना, परिसर सौंदर्यीकरण आणि सुरक्षायापैकी एकही टप्पा पूर्णत्वाला पोहोचला नाही. परिणामी जवळपास 80 टक्के काम सात वर्षांपासून जशास तसेच अडकून आहे.
सध्या हे विमान प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील ओसाड भागात उघड्यावर पडलेले आहे. उद्यानातील अकार्यक्षमता आणि देखभालीचा अभाव यामुळे हे विमान खेळण्याचा एखादा अवशेष आहे की खरे युद्धविमान, असा प्रश्न अनभिज्ञ पर्यटकांना पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात हे संरक्षण विभागाकडून मिळालेले दुसऱ्या महायुद्धात वापरलेले खरे मिग विमान आहे.
ब्रिटिशकालीन विजयस्तंभाची साक्ष असलेल्या शिवतर गावात आजही सैनिकी संस्कृती जिवंत आहे. अशा गावाला मिळालेल्या सन्मानाचे हे अधुरे रूप ग्रामस्थांना चांगलेच खटकत आहे. ‘शाहिदांच्या स्मृतीशी नगर परिषदेने निष्काळजीपणा केला आहे,’ असा आरोप करत माजी सैनिकांनी तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सात वर्षांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित? निधी मंजूर असतानाही काम का रेंगाळले? जबाबदार कोण? आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा मुद्दा का घेण्यात आला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता खेडकरांना अपेक्षित आहेत.