Devendra Fadnavis On Eknath Shinde :
महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुकांचे वारे वाहू लागले आहे. महायुती अन् महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणी किती जागा मागितल्या, कोणाकोणात धुसफूस अशा चर्चा सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.
रत्नागिरी येथे उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, 'अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यूडी विभागाने या ठिकाणी तयार केली. आज त्याचे उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो. आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे. अर्थात मी आणि शिंदे साहेब आलटूनपालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाहीये.'
दरम्यान, शिंदेची शिवसेना पदोपदी नाराज होत असल्याचा बातम्या सतत येत असतात. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी १०० पेक्षा जास्त जागांचा दावा ठोकला आहे. शिंदे सेनेचे अनेक नेते कधी अजितदादा तर कधी भाजपवर उघड उघड नाराजी व्यक्त करत असतो. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरचा व्यक्ती बदलला. ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली गेली. त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची निर्णय प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या साताऱ्यातील दरे गावी गेले होते. ही नाराजी काही दिवस चालली होती. अखेर दिल्लीतून सूत्र हलली अन् एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शिंदेंची पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची मनिषा काही लपून राहिलेली नाही. ते आजही आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं सांगतात. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा मी आणि शिंदे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो हा मिश्किल टोला असली तरी त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जाण्याची शक्यता आहे.