पावस : पर्यावरणातील बदल, ऊर्जा संकट आणि शेतीतील वाढती अनिश्चितता या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक व शाश्वत उपायांचा शोध घेणे आज जागतिक गरज बनली आहे. या संदर्भात ‘गवतातून’ मूल्यनिर्मिती कशी करता येईल, यावर रत्नागिरीतील मावळंगे गावचे सुपुत्र डॉ. राजस दत्तात्रय शिंदे यांनी युरोपमध्ये केलेले पीएचडी संशोधन विशेष लक्षवेधी ठरले आहे. ृ
आयर्लंडच्या कृषी मंत्रालयाच्या शिष्यवृत्तीवर युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क येथे त्यांनी या विषयात पीएचडी पूर्ण केली. बायोरिफायनरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गवत व शेतीतील जैवकचऱ्यापासून बायोगॅस, बायोप्लास्टिक, सेंद्रिय खत व जैव-रसायने तयार करण्याच्या शक्यता त्यांनी आपल्या संशोधनात अभ्यासल्या. बायोरिफायनरी म्हणजे काय? जसे ऑइल रिफायनरीमध्ये कच्च्या तेलापासून विविध उत्पादने तयार केली जातात, त्याचप्रमाणे बायोरिफायनरीमध्ये गवत, शेतीतील जैवकचरा व इतर नवीकरणीय जैविक घटक वापरून ऊर्जा आणि उपयुक्तजैव-उत्पादने निर्माण केली जातात. या तंत्रज्ञानामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीबरोबरच पर्यावरणपूरक उद्योगांना चालना मिळते.
जागतिक तापमान वाढ, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन, जीवाश्म इंधनांवरील अवलंबन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अनिश्चितता या समस्या जगभर गंभीर होत आहेत. गवतावर आधारित बायोरिफायनरी प्रकल्पांमुळे ऊर्जा स्वावलंबन, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि प्रदूषणात घट शक्य असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.डॉ. शिंदे यांनी चार वर्षांच्या संशोधन काळात प्रयोगशाळा पातळीवरील प्रयोग, संगणकीय मॉडेल्स तसेच आयर्लंडमधील बायोरिफायनरी प्रकल्पांचे सामाजिक, आर्थिक व धोरणात्मक पैलू अभ्यासले. त्यांच्या संशोधनाची दखल आयर्लंड सरकारने घेतली असून संबंधित धोरणांमध्ये त्यांच्या शोधनिबंधाचा संदर्भ वापरण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संशोधन सादरीकरण या कालावधीत त्यांनी इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या 27 हवामान परिषदेसह युनायटेड किंगडम, इटली, स्पेन व तुर्की येथे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले. या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा सन्मानही प्रदान करण्यात आला आहे.