चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील कात उद्योजकासह खेड तालुक्यातील सुकीवली येथे उद्योजकाच्या उत्पादन युनिटवर ईडीने छापेमारी केलली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत सावर्डे येथे असणार्या कात कारखान्यावर गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. ईडीचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी ठाण मांडून असून सायंकाळी उशिरापर्यंत ही छापेमारी सुरूच होती. मुंबई येथील सीआरपीएफचा फौजफाटा या ठिकाणी बंदोबस्तासाठी होता.
खेड तालुक्यातील सुकीवली येथील कात कारखान्यावरही ईडीने धाड टाकली 11 रोजी सकाळी आठ वाजता सरकारच्या तपासणी संस्थेचे विशेष अधिकारी मोठ्या पथकासह कारखान्यात दाखल झाले आणि तत्काळ विविध कागदपत्रे, आर्थिक नोंदी व व्यवहारांची तपासणी सुरू केली. अचानक वाढलेल्या हालचालीमुळे संपूर्ण परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर या प्रकाराची शहरासह जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
धाड टाकण्यात आलेले उद्योजक रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित नाव आहे. त्यांचा राजकीय परिघातही प्रभाव मानला जातो. त्यामुळे या कारवाईचा राजकीय वर्तुळातही मोठा उलथापालथीचा विषय बनला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी उशिरा पर्यंत ही तपासणी सुरू होती. मात्र अधिक अधिकृत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
काताची बेकायदेशीर लाकूडतोड, त्याची वाहतूक यामुळे आधीपासूनच हा कात उद्योग वन विभाग तसेच इन्कम टॅक्स व ईडीच्या रडारवर होता. मध्यंतरी या उद्योगावर इन्कम टॅक्सचा छापादेखील पडला होता. या शिवाय वन विभागाने देखील न्यायालयाच्या आदेशाने अनेकवेळा धाडी टाकून अवैध काताचा लाकूडसाठा जप्त केला होता. मध्यंतरी प्रदूषण खात्याने देखील सावर्डे येथील कात कारखाना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. परिसरातील 12 गावातील लोकांनी या कारखान्याविरोधात आवाज उठवला होता. सुमारे 15 दिवस उपोषण केले होते.
परिसरातील ओढ्याला प्रदूषित पाणी सोडणे, वायू प्रदूषण, सावर्डे परिसरात दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक व ग्रामस्थ हैराण झाले होते. त्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सावर्डे येथील कात कारखान्याचा विद्युत पुरवठा व पाणीदेखील तोडले होते. उद्योजक सचिन व संजय पाकळे यांच्या मालकीचा हा कात व्यवसाय आहे. ऐन वस्तीत हा
कारखाना चालवता जात असल्याने गेले अनेक दिवस त्या विरोधात तक्रारी होत्या. या शिवाय इन्कम टॅक्स व ईडीच्या रडारवर होता. अखेर आज सकाळी सावर्डे आणि सुकिवली (खेड) येथील दोन्ही कारखान्यांवर ईडीने छापा टाकला. या छापेमारीत कारवाई सुरू आहे. याच ठिकाणी पाकळे बंधूंचे घर देखील आहे. मात्र, दोन्ही बंधू घरात नसल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीमुळे मात्र जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
ईडीने टाकलेल्या छाप्याची माहिती स्थानिक पोलिस व अन्य कोणालाच मिळाली नाही. उशिरापर्यंत ईडीचे अधिकारी, कर्मचारी कात कंपनीच्या आवारात ठाण मांडून होते. काही कागदपत्रे, फाईल्स जप्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ईडी यापुढे कोणते पाऊल उचलणार हे महत्त्वपूर्ण असून अद्याप ईडीकडून कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. मात्र, अन्य कात उद्योजक व मित्रपरिवार महामार्गाच्या पलिकडे आसपास थांबून होता व या प्रकरणाचा अंदाज घेत होता.
शेठ हजेरी घेतील...ची धमकी
ईडीचा छापा पडल्याचे वृत्त कळताच माध्यम प्रतिनिधींनी सावर्डेकडे धाव घेतली आणि या प्रकरणात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांनी महामार्गालगत असणारे पाकळे यांचे प्रवेशद्वार, तेथे असणारा पोलिस बंदोबस्त आणि पोलिसांची हालचाल कॅमेर्यात टिपण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ आणि फोटो काढले. यावेळी पलिकडून, फोटो काढू नका. शेठना सांगेन. शेठ एका-एकाची हजेरी घेतील’, असा दम दिला. मात्र, पत्रकारांनी फोटोसेशन केलच. यावेळी या दादागिरी करणार्याने काही पत्रकारांचे फोटोदेखील काढले. आता हे फोटो शेठला देतो. तो तुमची हजेरी घेईल, अशी धमकीही दिली.