मद्यधुंद चालकाने रागामधून हॉटेलसमोरील दुचाकींना कारद्वारे नासधूस केली Pudhari File Photo
रत्नागिरी

मद्यधुंद चालकाचा हॉटेलमध्ये कार घुसविण्याचा प्रयत्न

पाणी बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून कृत्य; एक कर्मचारी जखमी

करण शिंदे, पुढारी वृत्तसेवा

चिपळूण, शहर पुढारी वृत्तसेवा : हॉटेल कर्मचार्‍यासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून एका चारचाकी चालकाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील चारचाकी गाडी कर्मचार्‍याच्या अंगावर घालत थेट हॉटेलमध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरातील पार्किंगमधील उभ्या असलेल्या अन्य वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या हॉटेल कर्मचार्‍याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी परिसरात जमलेल्या नागरिकांनी त्या मद्यधुंद चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही घटना शहरातील काविळतळी परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या पार्किंग परिसरात शनिवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्री 9.30 नंतर एक चारचाकी वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत काविळतळी परिसरात असलेल्या एका हॉटेलनजीक थांबला. त्याने वाहनातूनच हॉटेलच्या कर्मचार्‍याला पाणी आणण्यास सांगितले. कर्मचार्‍याने त्या संबंधिताला अन्य वाहनांना अडथळा होणार नाही, अशी गाडी बाजूला लावा असे सांगून पाणी दिले.

मात्र, संबंधित कर्मचार्‍याने पॅकिंग बॉटल दिल्याचा व गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात ठेवून मद्यधुंद अवस्थेत त्या वाहनचालकाने आपल्या ताब्यातील चारचाकी थेट हॉटेलच्या दिशेने वळवून संबंधित कर्मचार्‍याच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. भर वेगाने अचानकपणे ही चारचाकी हॉटेलच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच हॉटेलच्या बाहेर उभे असलेल्या ग्राहकांसहीत कर्मचार्‍यांची तारांबळ उडून पळापळ झाली.

यामध्ये एक कर्मचारी चारचाकीची धडक बसून जखमी झाला तर बेफाम वेगाने गाडी घुसविल्याने हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या अन्य वाहनांना धडक देऊन वाहनांचे नुकसान केले. हॉटेलच्या बाहेर काही टेबल असल्यामुळे वाहनांची त्या टेबलनाही जोरात धडक बसली. या टेबल मोडून ही गाडी थेट हॉटेलमध्ये शिरली नाही. धडक बसल्यावर झालेल्या गोंधळानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी संबंधित वाहनचालकाला जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला काहीही बोलता येत नव्हते, तर तो जमावाच्या दिशेने अपशब्द वापरत होता. यामुळे संतप्त जमावाने त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरापर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT