रत्नागिरी: बनावट तसेच कालबाह्य औषधांविरोधात तक्रार आल्यानंतर संबंधित मेडिकल्सवर कारवाई करून औषधांचे नमुने पुणे प्रयोगशाळांकउे पाठवले जातात. नमुन्यांचा निकाल लागायला तीस दिवस, तर कधी तीन महिने लागतात. यापुढे निकालासाठी पुणे प्रयोगशाळेवर आता अवंलबून राहण्याची गरज राहणार नाही. कारण राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत चाललेल्या बनावट आणि भेसळयुक्त औषधांच्या तक्रारींवर अखेर राज्य सरकार काऊंटरफिट ड्रग डिटेक्शन डीव्हाइस ही अत्याधुनिक उपकरणे खरेदी करणार आहे. यामुळे औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासता येणार असून भेसळ आढळल्यास तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.
कारवाईदरम्यान जप्त केलेल्या औषधींची गुणवत्ता जागेवरच तपासून तत्काळ निकाल मिळणार आहे. औषधांची गुणवत्ता जागेवरच कळत असल्याने बोगस तसेच कालबाह्य औषधींची विक्री करणाऱ्यांना रोखता येणार आहे. मुंबई तसेच राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बनावट आणि भेसळयुक्त औषधीच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली आहे. राज्यात औषधी निरीक्षकांची तब्बल 78 टक्के पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात औषधी निरीक्षकांची संख्या कमी आहेत. जिथे दहा ते 15 औषध निरीक्षकांची गरज असते तेथे दोनच निरीक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
पूर्णवेळ एकही औषध निरीक्षक नाही
रत्नागिरीसाठी अन्न व औषध विभागाचा पदभार रायगड येथील अधिकाऱ्यास अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ काम करणे शक्य नाही. औषधसाठी सहायक, औषधनिरीक्षक असे दोन पदे आहेत. मात्र संख्या कमी असल्यामुळे तक्रारींची संख्या वाढत आहे. मेडिकल्स, ब्लड बँका तसेच औषधनिर्माण कंपन्याची तपासणी करणे अवघड होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हजारो औषधी दुकाने आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पूर्णवेळ एकही औषध निरीक्षक नाही .