गुहागर शहर: परदेशात सक्तीने बंद करून न्यायालयीन कारवाईनंतर तुरुंगाची शिक्षा झालेली रासायनिक कंपनी तेथील सर्व जुन्या यंत्रसामुग्रीसह भारतामधील कायद्यांचा दुरुपयोग करून जिल्ह्यात सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिलेल्या सर्व रासायनिक व अन्य कंपन्यांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, दाभोळ खाडी व लोटे औद्योगिक क्षेत्र, सावित्री नदी खाडी व महाड औद्योगिक क्षेत्र या सर्व भागात असणाऱ्या विविध रासायनिक कंपन्यांबद्दल अनेकांना भीती वाटू लागली आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये बॉयलरचे स्फोट होणे, रसायन अंगावर उडणे असे वारंवार अनेक अपघातही होत असतात. यातील अनेक अपघातांची नोंदही केली जात नाही. अनेक कंपन्या उत्पादनाचा एक दाखला घेतात व नंतरच्या काळात उत्पादन जरी बदलले तरी सर्व व्यवस्थेसह हा विषय कोणालाही माहिती न होता सुरू राहतो. मोठा अपघात झाल्यावर काही काळ याची चर्चा, चौकशी होते, असे ते म्हणाले.