राजापूर : राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. राम मेस्त्री यांच्यामुळे विषारी जातीच्या सर्पदंशामुळे दोन गंभीर रुग्णांचा जीव वाचला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
कोल्हापूर येथे विभागीय स्तरावरील कार्यशाळा आटोपून राजापूरकडे परतणार्या डॉ. मेस्त्री यांना अर्ध्या वाटेतच ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकार्यांचा फोन आला की, फुरसे जातीच्या सर्पदंशाची महिला रुग्ण दाखल झाली आहे. नवख्या डॉक्टरांना मार्गदर्शन करून ते पुढील प्रवासाला लागले. काही मिनिटांतच पुन्हा फोन आला की, आणखी एक रुग्ण दाखल झाला आहे व त्याची परिस्थिती आणखी गंभीर असून रुग्ण पूर्णपणे मद्यप्राशन केलेला, नातेवाईक नसलेला आहे.
यावेळी नवख्या अधिकार्यांना स्लो मेथडने उपचार सुरू करण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिले. मात्र रुग्णाची परिस्थिती चिंताजनक झाली. अखेर डॉ. मेस्त्री रात्री सव्वादहाला राजापूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि क्षणाचाही विलंब न लावता उपचाराला सुरुवात केली. अखेर रक्तस्राव थांबला, उलट्या कमी झाल्या आणि रुग्णाचे व्हायटल्स स्थिर होऊ लागले. परिस्थिती नियंत्रणात आणून ऑन-ड्युटी टीमला पुढील मॉनिटरिंगच्या सूचना देऊन डॉ. मेस्त्री रात्री उशिरा घरी परतले. सकाळी आलेला फोन मात्र सुखावह होता...‘रुग्ण आता पूर्णपणे स्टेबल आहे.’ डॉ. मेस्त्री यांनी मागील पंचवीस वर्षांत सुमारे 3000 च्यावर सर्पदंश रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत.