रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे राज्य शासनाने दोन वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. तर उपजिल्हाधिकारी हर्षलता गोडसे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूल व वन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार प्रशासकीय कामकाजातील कथित अनियमितता आणि शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाचा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असून, चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाणार आहे.
महसूल विभागातील एकाच वेळी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः भूसंपादनाशी संबंधित कामकाज आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या चौकशीत नेमक्या कोणत्या अनियमितता समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शासनाने चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, संबंधित प्रकरणातील सर्व बाबींची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे समजते. चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणातील अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत.