

मुंबई / रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारक प्रकल्पाला अखेर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. स्मारकासाठी ३५० कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमीनही संपादित करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. सामंत म्हणाले की, स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भागासह आवश्यक अतिरिक्त जागेच्या संपादनाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
स्मारकाला ऐतिहासिक वैभव आणि जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या स्मारकासाठी यापूर्वी ४१७ कोटी ७५ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी ५ मार्च २०२५ रोजी विधिमंडळात स्मारकाची घोषणा केली होती, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतूद जाहीर केली होती. त्यानंतर नियोजन विभागामार्फत प्रकल्प अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात आला. मात्र, स्मारकासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
स्मारकाची जागा कसबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने ग्रामविकास विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचा प्रस्तावच अद्याप पाठविण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे वर्षभर प्रकल्पाची प्रक्रिया लाल फितीत अडकून पडली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी मार्च २०२५ मध्ये जागेची पाहणी केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात मुघलांनी फितुरीने कैद केले होते. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील या पवित्र स्थळाचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता विधान परिषदेत सरकारने नव्या आराखड्याची घोषणा केल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.