Green Refinery Project
रिफायनरी मार्गी लागण्यासाठी भूमिपुत्रांचे शिष्टमंडळ नारायण राणे यांना भेटणार आहे. 
रत्नागिरी

रिफायनरी मार्गी लागण्यासाठी भूमिपुत्रांचे शिष्टमंडळ खा. नारायण राणेंना भेटणार

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूरचा रखडलेला विकास, वाढती बेरोजगारी याचा विचार करता राजापूर तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक असून तशी मागणी बारसू गावचे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी विनायक कदम यांनी केली आहे. हा प्रकल्प माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हेच मार्गी लावू शकतात याची आम्हा स्थानिक शेतकर्‍यांना खात्री असून, यासाठी लवकरच स्थानिक शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन खा. राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.

या प्रकल्पाला विरोध असल्याचे केवळ भासविले जात आहे, प्रत्यक्षात किती आणि कुणाचा विरोध आहे, हे तपासले पाहिजे, ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आणि आम्ही अन्य प्रकल्प आणू व या भागाचा विकास करू, अशी ग्वाही दिली ते आता कुठे आहेत? किती प्रकल्प त्यांनी आजपर्यंत आणले? असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत. केवळ स्वार्थासाठी जनतेचा वापर करून या मंडळींनी स्वार्थ साधल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. कधी विरोध करायचा तर कधी पाठिंबा द्यायचा अशी दुटप्पी भूमिका स्थानिक आमदारांनी घेतली. विकासासाठी, इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काहीच केले नाही, कायमच भावनिक राजकारण करून आपली पोळी भाजल्याची टिकाही कदम यांनी केली.

राजापूरचे मागासलेपण दूर करायचे आहे

इथल्या स्थानिक जनतेला हा प्रकल्प हवा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राजापूरचे मागासलेपण आम्हाला दूर करायचे आहे, स्थानिक बेरोजगार तरूणांना आम्हाला रोजगार द्यायाचा आहे, त्यामुळे आता आंम्ही स्थानिक शेतकरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खा. नारायण राणे यांची भेट घेणार आहोत, या साठी प्रसंगी दिल्लीत जावे लागले व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घ्यावी लागली तरी तीही खा. राणे यांच्या माध्यमातून घेणार आहोत असेही कदम यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT