खेड (पुढारी वृत्तसेवा): लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित कोका कोला प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जून) शांततापूर्ण पण ठाम असा मुक मोर्चा काढला. हातात काळे झेंडे घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि कंपनीविरोधात निषेध व्यक्त करत लोटे औद्योगिक क्षेत्रातून मोर्चा काढला.
हा मोर्चा असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झाला आणि औद्योगिक वसाहतीतून फिरून परत ग्रामपंचायतीपाशी शांततेत संपन्न झाला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि असगणी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामस्थांनी नोकरभरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत,” असा आरोप ग्रामस्थांनी केला. कोकणातील हा एक मोठा औद्योगिक प्रकल्प असून, त्यामुळे स्थानिक युवकांमध्ये रोजगाराबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, त्या आशांवर पाणी फिरल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे.
सरपंच संजना बुरटे म्हणाल्या: “आमच्या गावातील तरुण बेरोजगार आहेत. कोका कोला कंपनीने स्थानिकांना कामाची संधी दिली पाहिजे. भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, अन्यथा ग्रामस्थांच्या भावना भडकू शकतात.”
सामाजिक कार्यकर्ते हुसैन ठाकूर यांचा इशारा: “आम्ही आमच्या हक्कासाठी शांततामय मोर्चा काढला आहे. पण यापुढेही जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र होईल.”