

घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू असून पावसामुळे एका बाजूची भिंत ढासळली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर किल्ल्याच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम पूर्ण झालेले नाही. सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करून घेतले जाईल, असे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरातील श्री घेरा यशवंतगड किल्ल्याचे डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू असून आठ दिवसांपूर्वी नवीन बांधकाम केलेली एक भिंत ढासळली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी संताप आणि रोष व्यक्त करताना ठेकेदार आणि पुरातत्त्व विभागाने त्यांना या कामाबाबत काहीच माहिती दिलेली नाही, असे म्हटले आहे.
या बाबत महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांच्याशी संपर्क साधला असता, घेरा यशवंतगड हा किल्ला पुरातत्त्व विभागाकडे संरक्षित स्मारक म्हणून असून याची देखभाल दुरुस्ती या विभागाकडूनच होत असते. त्या अनुषंगाने किल्ला संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने प्रस्ताव पाठविला होता. या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून दुरुस्ती आणि डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे.
कामाच्या प्रारंभी स्थानिक ग्रामस्थांसह शिव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष यांची या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यानंतरही ज्यांनी ज्यांनी माहिती विचारली, त्यांना आवश्यक माहिती सांगण्यात आल्याचे वाहने म्हणाले.