CNG Price Hike Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri CNG Shortage: गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात; रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा; पंपांवर 2 ते 3 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा

Ratnagiri CNG Shortage | चाकरमान्यांबरोबरच दररोजचे प्रवासी, पर्यटकांची होतेय गर्दी; चारचाकी, रिक्षा चालक तासनतास रांगेत राहताहेत उभे

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवामुळे लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र वाढत्या गर्दीमुळे शहरासह ग्रामीण भागात सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. चारचाकी, रिक्षा चालकांना सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभे राहून सीएनजी भरावे लागत आहे. त्यामुळे चाकरमानी, नोकरदार, पर्यटक चांगलेच हैराण झाले आहेत.

मागील तीन दिवसांपासून विविध सीएनजी पंपांवर गर्दी होत आहे. जिल्हा प्रशासन, पंप चालकाने नियोजन योग्य न केल्यामुळे त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. गणेशोत्सव सणाला प्रत्येक कोकणकर हमखास आपल्या मूळ गावी येतोच.

काहीजण रेल्वे, एसटीचा आधार घेऊन येतात, तर काही चाकरमानी चारचाकीने येत असतात. मात्र सणासुदीत सीएनजीचा तुटवडा होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घेण्याची गरज होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन सणासुदीत सीएनजी गॅस भरण्यासाठी चारचाकी, रिक्षा चालकांना एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांग लावावी लागत आहे.

तासनतास उभे राहिल्यानंतर चालकाचा नंबर आलेला असताना सीएनजी संपल्याचा बोर्ड लागल्यामुळे चारचाकी, रिक्षा चालक वैतागले आहेत. चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली तर स्थानिक रिक्षाचालकांनाही याचा फटका बसत आहे.

रत्नागिरी, हातखंबा, पालीसह विविध सीएनजी पंपांवर रांगा

रत्नागिरी शहरात माळ नाका, एमआयडीसी जे. के. फाईल्स, हातखंबा, नाचणे, चिपळूण, खेड येथे एमजीएल, लांजा, पाली यासह विविध ठिकाणी सीएनजी पंपांवर आता दोन ते तीन किलोमीटर रांगाच रांगा दिसून येत आहे.

गणेशोत्सवामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात येणार असल्याचे माहित असूनसुद्धा प्रशासनाच्या वतीने सीएनजी पंपांवर सीएनजी गॅसचा मुबलक साठा ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे होत नाही. कधी सुरू असते तर कधी गॅस बंद असते. चारचाकी, रिक्षांची वर्दळ वाढल्यामुळे सीएनजी पंपावर गर्दी होत आहे. पंपचालकाने नियोजन करणे अपेक्षित आहे.
- समीर पाटील, चारचाकी चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT